नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

जीर्णोद्धार - श्री. मा. भावे

Go down

जीर्णोद्धार - श्री. मा. भावे Empty जीर्णोद्धार - श्री. मा. भावे

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 10:37 pm

जीर्णोद्धार - श्री. मा. भावे 7987_MahaSan_L

भारतानं १९९१मध्ये आर्थिक सुधारणा अमलात आणण्याचा निर्णय घेतला आणि ‘ग्लोबलायझेशन’चं युग या देशी अवतरलं. त्यानंतर झपाट्यानं मध्यमवर्गाच्या हातात पैसा खुळखुळू लागला आणि त्या वर्गाचं रूपांतर उच्च-मध्यमवर्गीयात होऊन गेलं. ‘मध्यमवर्गा’ला आपल्या हातातील आर्थिक शक्तीची जाणीवही त्याच काळात झाली आणि त्याच सुमारास पवन वर्मा यांचं ‘राईज ऑफ इंडियन मिडल क्लास’ हे पुस्तकही आलं. पण खर्‍या अर्थानं आणि तोही बौद्धिक क्षेत्रात भारतात मध्यमवर्गाचा उदय हा एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच झाला होता. राजा राममोहन रॉय यांनी ‘मध्यमवर्ग’ हा शब्द पहिल्यांदा वापरला! पण तो कार्ल मार्क्स या विचारवंताला अभिप्रेत असलेल्या संकल्पनेतून मात्र नव्हे. रॉय यांना अभिप्रेत असलेल्या या मध्यमवर्गाची भूक दांडगी होती पण ती बुद्धीच्या क्षेत्रातील होती. त्याच सुमारास मराठीतून काही नव्या संकल्पना, नवा विचार देणारी पुस्तकं येऊ लागली होती. आता काळाच्या ओघात ती ग्रंथालयांच्या अलमार्‍यांमध्ये ठाणबंद झाली असली, तरी त्यांचा ‘जीर्णोद्धार’ करून श्री. मा. भावे यांनी एक मोठंच काम केलं आहे.

भावे हे गणित आणि तत्त्वज्ञान अशा दोन विषयात डॉक्टरेट संपादन करणारे पुण्याच्या वाडिया कॉलेजमधील एक ज्येष्ठ प्राध्यापक. वाईच्या विश्वकोश मंडळाशी त्यांचा निकटचा संबंध होता. तेथे आणखी एक ज्येष्ठ विचारवंत प्रा. मे. पुं. रेगे यांच्याशी त्यांचं अशा जुन्या पुस्तकांबाबत नेहमीच बोलणं होई आणि त्यातूनच ‘नवभारत’ या नियतकालिकात भावे यांचं अशा जुन्या पुस्तकांची ओळख करून देणारं एक सदर सुरू झालं.

त्या सदरातील लेखांचा संग्रह ‘जीर्णोद्धार’ याच नावानं प्रकाशित करून लोकवाङ्मय गृह या नामांकित प्रकाशन संस्थेने मोठीच कामगिरी पार पाडली आहे. भावे यांनी या लेखांमधून ज्या पुस्तकांची ओळख आपल्याला नव्यानं करून दिली आहे, ती त्यांनी पूर्वी कधी काळी वाचलेली होती. पण आजच्या बदलत्या युगात मात्र ती उपलब्ध होणं अगदीच कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळेच भावे यांनी केलेलं हे काम मोलाचं ठरतं. कारण पुस्तकं दुर्मिळ झाली असली, तरी त्यांतील विचार आणि संकल्पना या आजही महत्त्वाच्याच ठरू पाहणार्‍या आहेत.

भावे यांनी या लेखांमधून ज्या पुस्तकांची ओळख करून दिली आहे, त्यापैकी पहिले पुस्तक हे १८०४ साली लिहिलेले असून अखेरचे पुस्तक १९३० साली प्रकाशित झालेलं आहे. नेमक्या याच काळात महाराष्ट्रात टिळक, आगरकर, रानडे यांचा उदय झाला आणि त्यांनीही अत्यंत महत्त्वाचे असे विचार मांडले. शिवाय, याच काळात महात्मा जोतिबा फुले हेही क्रांतिकारी असा नवविचार देण्याचं काम करत होते. भावे यांनी अशा आजही जाणीवपूर्वक विचारात घेतल्या जाणार्‍या लेखकांची पुस्तके आपल्या संग्रहात घेतलेली नाहीत आणि ते साहजिकच आहे. खर्‍या अर्थानं आज दुर्मिळ असलेली पुस्तकं आणि त्यातील विचार व त्यावरील भावे यांचं भाष्य हे त्यामुळे अधिकच मोलाचं होऊन गेलं आहे.

दत्तात्रय बळवंत पारसनीस यांचं ‘भारतवर्ष’, गोविंद बाबाजी जोशी यांचं ‘माझे प्रवासाची हकिकत’, ‘हरीभाईंची पत्रे’ (ह. ना. आपटे यांनी काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांना लिहिलेली पत्रे), महादेव शिवराम गोळे यांचं ‘ब्राह्मण आणि त्यांची विद्या’, विद्याधर पंडित यांचं ‘हिंदुधर्म आणि सुधारणा’, विनायक कोंडदेव ओक यांचं ‘प्रपंचरहस्य’, आप्पाजी विष्णू कुलकर्णी यांचं ‘मराठी रंगभूमी’, ‘निबंधरत्नमाला’, ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांचं ‘संकीर्ण लेख’, ना. ह. आपटे यांचं ‘सुखाचा मूलमंत्र’, दत्तो आप्पाजी तुळजापूरकर यांचं ‘माझे रामायण’ आणि श्री. म. माटे यांचं ‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ अशा अत्यंत मौलिक विचार मांडणार्‍या पुस्तकांचा ‘जीर्णोद्धार’ हा मूळातूनच वाचायला हवा. त्या पुस्तकांविषयी येथे त्यामुळेच काही लिहिलेलं नाही.

शिवाय, या पुस्तकास स्वत: लेखकानं लिहिलेली सत्तर पानांची प्रस्तावना तर महाराष्ट्रात यापुढे ज्या कोणाला बौद्धिक क्षेत्रात काही काम करावयाचे आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत टाळून चालणार नाही. त्यामुळे हे पुस्तक साहित्य, संस्कृती, समाजकारण क्षेत्रांतील एक मैलाचा दगड बनले आहे.

प्रकाश अकोलकर
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही