नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

चकवा... एक कथा

Go down

चकवा... एक कथा  Empty चकवा... एक कथा

लिखाण  sandykul07 on Tue May 15, 2012 12:24 pm

उच्चशिक्षित मुलांनाही लग्नासाठी जातीपातीच्या चौकटीत बांधून ठेवणारे आई-वडील त्यांच्या इच्छा झुगारतात. तर परदेशस्थ मुलं, त्यांचे पगार यांना भुलून दुसरं काहीच न बघणारे आपल्याच मुलींची भविष्य, त्यांची सुरक्षितता पणाला लावतात. एकमेकांना सगळं चांगलं बघून दिलं, आता दोघं सुखानं नांदतील, या घरच्यांच्या अपेक्षा मात्र सपशेल फसतात. दोघांचं सुख टांगणीला लावून केलेलं लग्न एकमेकांना बोचत-टोचत अधांतरीच राहतं..!

पूर्वी माहिती असलेल्या कुटुंबात, नातलगात किंवा मध्यस्थांच्या मार्फत मुलगी देण्याचा प्रघात होता. त्यातून मुलगी जवळच्या जवळ दिली जावी, असेही प्रयत्न असत. पुढे शिक्षण, व्यवसाय, नोकरीच्या विविध संधींमुळे गावाकडची तरुण मंडळी शहरांमध्ये स्थिरावली आणि अपवादात्मक दिसणारी स्वतंत्र कुटुंबपद्धती सर्रास अस्तित्वात आली. ‘आयटी’ क्षेत्राने तर कमालच केली. भारतातून परदेशी जाणार्‍या तरुण-तरुणींचं प्रमाण लक्षात येण्याजोगं वाढलं. म्हणजे इतकं की वधू-वर सूचक मंडळांमध्ये तर या परदेशी स्थळांचा वेगळा विभागच असतो. अर्थातच या मुलांना वधुपिते कायम पसंतीची पावती देतात. इंटरनेटच्या माध्यमातून ही स्थळं सहजपणे माहितीसाठी उपलब्ध होतात. एरवी अनेक चौकश्या करणारे वधुपिते अमेरिकेचं स्थळ पाहिल्यावर मात्र नि:शंकपणो फारशी चौकशी न करताच मुलगी द्यायला तयार होतात, असं लक्षात येतं. किंबहुना इतकी या फॉरेनच्या जावयांची क्रेझ आहे.

माझ्या परिचयामध्ये असलेल्या किंवा समुपदेशनासाठी आलेल्या जोडप्यांमध्ये अनेक परदेशस्थ जोडपी खरोखर सुखानं परदेशामध्ये नांदत आहेत. पण फसलेल्या लग्नांचं प्रमाणही कमी नाही. अर्थातच यात फसवणूक मुलींची झालेली असते आणि कांगावा मुलं करतात. तरीही हे सर्वसाधारण विधान नाही. अपवादात्मक का होईना मुलांचीही फसवणूक झाल्याची उदाहरणं आहेत.

एका परदेशस्थ स्थळाच्या मोहात पडलेल्या एका कुटुंबाची ही कहाणी. सुनेत्रा वय वर्ष चोवीस. इंजिनिअर झालेली. वर्ष दीड वर्ष नोकरी झाल्यावर मुलगी लग्नाची झाली म्हणून घरात तिला उजवण्याची घाई सुरू झाली. एकेठिकाणी हुंड्यामुळे लग्न फिसकटलेलं म्हणून घरात जास्तच नाराजी अन् अस्वस्थता. दरम्यान, हे स्थळ कळलं. मुलगा अमेरिकेत स्थायिक. भरपूर पगार. उंच, देखणा गोरा. अगदी हवा तस्सा. फक्त एक महिन्यासाठी भारतात आलेल्या सचिनला सुनेत्राचं स्थळ दाखवलं गेलं. सुनेत्रा आणि तिचं कुटुंबीय सचिनचं व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या अमेरिकेतल्या वास्तव्याच्या वलयाला इतके भुलले की कोणताही विचार न करता, चौकशी न करता पुढच्या सात दिवसांत लग्न करून मोकळे झाले. लग्नात चांगला आठ दहा लाख रुपये खर्च केला. सुनेत्रा सासरी मुंबईला रवाना झाली. तिथे पंधरा दिवस राहून सचिन एकटाच अमेरिकेला जाणार होता. या पंधरा दिवसांतच सुनेत्राला सचिन परका वाटला. पहिल्या दिवशीपासूनच ‘तू मला आवडत नाहीस. आपण एकमेकांना साजेसे नाही. तू फार बारीक आहेस. तुझ्याबरोबर मजा येत नाही.’ असं सचिन म्हणायला लागला. असं असेल तर मग आपल्याशी यांनी लग्न का केलं हेच सुनेत्राला कळेना. तिला त्या घरातलं वातावरणही खूप कोंदट वाटलं. मुंबईच्या वास्तव्यातल्या या पंधरा दिवसांत सुनेत्रानं स्वयंपाकाची सगळी जबाबदारी उचलली. सासू आणि नणंदेनं त्या कामातून हातच काढून घेतले. या पंधरा दिवसांत ते कुठेही फिरायला गेले नाहीत. ‘मला आई-वडिलांजवळ राहू दे. अमेरिकेत हनिमूनच आहे,’ असंही सचिन म्हणाला. मुळातच समजूतदार असलेल्या सुनेत्रानं हे मान्य केलं. पण त्याला आपल्याबद्दल ओढ वाटत नाही हे तिच्या लगेच लक्षात आलं. नव्या नवलाईचे संबंधही तिला यांत्रिक वाटत होते. प्रेमापेक्षा त्यात गरज किंवा वापराचा भाग दिसत होता. कदाचित सचिन नवीन नातं अजून स्वीकारू शकत नसेल पण सवयीनं होईल सगळं नीट, असा सुनेत्राला विश्‍वास वाटला.

अमेरिकेला जाताना सचिन आधी एकटाच गेला. नोकरी नसलेल्या आपल्या बायकोच्या हातात एक फुटकी दमडीही न देता तो तिकडे रवाना झाला. पुढे चार महिने तिची मोबाईलची हजारो रुपयांची बिलं तिच्या वडिलांनी भरली. इंटरनेटवर चॅटिंग करतानाही तू मला आवडत नाहीस, शोभत नाहीस, फार घाई केली लग्नाला असं म्हणायचा. अमेरिकेतूनही तो तिच्यावर जरब ठेवून होता. तिचे नातेवाईक घरात आलेले चालत नव्हते. खर्चायला पैसे देत नव्हता. अखेर सुनेत्राही चार महिन्यांनी अमेरिकेला रवाना झाली. तिनं सचिनच्या म्हणण्याप्रमाणे स्वत:ला थोडंसं ग्रुम केलं होतं. वजन वाढवलं होतं. त्यानं अगदी थंडपणे स्वागत केल्यामुळे विमानतळावरच तिचा विरस झाला. तू चांगली दिसत नाहीस, तुझ्याजवळ यावंसं वाटत नाही, तुझे कपडे मोलकरणीसारखे आहेत वगैरे वगैरे. सुनेत्राला आधी बारीक आहेस म्हणून मजा येत नाही, असा म्हणणारा सचिन ‘आता तू जाड झाली आहेस,‘ असं म्हणून घरात कपडे आणि भांडी धुण्याची यंत्र असूनही हातानं धुवायला लावायचा. सुनेत्राची इतर बायकांशी तुलना करणं, त्या बायकांकडे मुद्दाम घाणेरड्या नजरेनं बघणं, तिला हिडीसफिडीस करणं हे सुरूच होतं. त्यानं तिचा मोबाईल बंद करून टाकला. घरातली इंटरनेटची सुविधा बंद केली. बाहेर नेलं तरी कोणाशी बोलू द्यायचा नाही. काही वेगळं खायची इच्छा व्यक्त केली तर तिथेही टोमणे मारायचा. पण ‘आवडत नाही तर तू लग्न का केलंस? आधी तू हे का सांगितलं नाहीस?’ असं विचारल्यावर निरुत्तर व्हायचा. आपलं याच्यावर ओझं नको म्हणून सुनेत्रानं तिथे नोकरी करायला सुरुवात केली. त्यातून मिळालेले दीड लाख रुपये सचिनने स्वत:जवळच ठेवून घेतले आणि अखेर एके दिवशी ‘माझ्या आईची तब्येत बिघडली आहे म्हणून तू देखभालीसाठी जा’ असं सांगून सुनेत्राला परत भारतात पाठवून दिलं. सुनेत्रा तीन वर्षांनी भारतात येत होती, इथे आल्यावर बघते तर तिच्या सासूबाई अगदी ठणठणीत होत्या. हे सगळं नाटक होतं तर, आता तिला सगळा उलगडा झाला. त्याला घटस्फोट हवा होता म्हणून त्यानं तिला पाठवून दिलं होतं. परत एकदा सासूसासर्‍यांनी त्याची समजूत घालून त्याला हे नातं पुढे न्यायला भाग पाडलं. त्यानं तिथूनच ‘तू भारतात आहेस तोपर्यंत व्यक्तिमत्त्व विकासाचे कोर्सेस कर. मी भारतात आल्यावर तुला बघेन आणि मग ठरवेन तुझ्याबरोबर राहायचं की नाही ते!’ असं सांगितलं. इतक्या अपमानास्पद अटीला सुनेत्रा आणि तिच्या घरचे तयार झाले याचंच नवल वाटतं!

सचिन पुन्हा भारतात आला. या वास्तव्यात ठाण्यात एका मान्यवर संस्थेमध्ये ते दोघंही समुपदेशनाला जात होते. पंधरा दिवस सुनेत्राबरोबर राहून, रोज शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर सचिनने ‘तू मला घटस्फोट कधी देतेस?’ असा प्रश्न सुनेत्राला विचारला! सुनेत्राने अर्थातच नकार दिला आणि ‘या संबंधांनंतर मी जर गरोदर राहिले तर काय?’ असा प्रश्न तिनं केल्यावर ‘गर्भपात करून मिळतात भारतात’ असं सांगून तो अमेरिकेला निघून गेला. सुनेत्राशी त्याने पूर्ण संबंध तोडून टाकला. तोपर्यंत ती सासरीच राहत होती. सचिन घरातल्या लोकांशी फोनवर बोलला तरी तिच्याशी बोलत नसे. नंतर फक्त घटस्फोटासाठीच फोन करायचा. सुनेत्राला खूप शिव्या द्यायचा. अखेर २00८ मध्ये या मानसिक छळाला कंटाळून सुनेत्रा नाइलाजास्तव घटस्फोटाला तयार झाली.
घटस्फोटाची केस कोर्टात दाखल झाली. सुनेत्रा माहेरच्या घरी परतली. आता मात्र सुनेत्रानं काही कोर्सेस करून स्वत:ला अपडेट केलं. भारतात तिला चांगली नोकरीही लागली. त्यामुळे सचिननं पोटगीदाखल रक्कम देण्यास नकार दिला. कोर्टासमोर मात्र सचिननं पालकांच्या दबावाला बळी पडून मी लग्न केलं ही माझी चूक झाली हे कबूल केलं. सुनेत्रा खूप चांगली मुलगी आहे हेही कबूल केलं. पण मला ती कधीही आवडली नव्हती, माझं तिच्यावर कधीच प्रेम नव्हतं म्हणून घटस्फोट घ्यायचा आहे, असं नमूद केलं. पोटगीचा मुद्दा निघाल्यावर मात्र सचिन उलटला. मी नांदवायला तयार आहे पण तीच माझ्याकडे येत नाही, अशी उलट केस दाखल केली. त्यावर सुनेत्रानं सचिन भारतात स्थायिक झाला तर मी त्याच्याबरोबर राहायला तयार आहे फक्त माझ्या संरक्षणाची जबाबदारी कोर्टानं घ्यावी, असं सुचवलं. अखेर सुनेत्रानं मागितलेली पोटगीची व नुकसानभरपाईची रक्कम कोर्टामार्फत सुनेत्राला मिळाली आणि कधीही न जुळलेलं एक सहजीवन संपलं!
या केसमध्ये खरंतर सुनेत्राला पहिल्या दिवशीपासून धोक्याची सूचना मिळाली होती. पहिल्या पंधरा दिवसांतच सुनेत्रानं निघून यायला हवं होतं. पण संस्कार, सामाजिक चालीरीती, कौटुंबिक प्रतिष्ठा, लग्नित नातेसंबंध याविषयी चालत आलेल्या चुकीच्या समजुती सुनेत्राला पुढे रेटत होत्या, सर्व काही सहन करण्याची बळजबरी करत होत्या. आई-वडिलांच्या काळजीपायी सुनेत्रानं अनेक गोष्टी घरच्यांपासून दडवून ठेवल्या होत्या. लग्नानंतरही मुलीला आर्थिक मदतीसाठी आपल्याकडे हात पसरावा लागतो आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे, हे सुनेत्राच्या घरच्या लोकांच्या लक्षात येऊनही तिकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. खरं म्हणजे सुनेत्रा स्वत: हुशार, सुशिक्षित, गोरीपान, दिसायला सुरेख, स्वभावानं सालस असूनही तिच्याबाबत असं का घडावं? सुनेत्रानं तीन साडेतीन वर्षांनी घरी सांगितल्यावर तिच्या घरच्यांना हा धक्का पचवणं फार कठीण गेलं. आपण कोणत्या वलयाला भुललो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. आईनं तर अंथरूणच धरलं.
या केसमध्ये असलेले तरुण-तरुणी एका विशिष्ट समाजाचे आहेत. आपल्याच समाजातल्या मुलाशी अथवा मुलीशी लग्न करण्याच्या पालकांच्या अट्टहासापायी हे लग्न झालं होतं. नंतर समजलेल्या माहितीनुसार सचिनची आधी एका परजातीतल्या मुलीशी मैत्री होती. पालकांच्या जातीच्या अट्टहासापायी त्यांनी सुनेत्राशी लग्न केलं होतं. तो त्या संबंधात खूश नव्हता. पण शारीरिक गरजेसाठी मात्र हक्काची बायको म्हणून सुनेत्राची कधीही सुटका नव्हती. सुनेत्राशी घटस्फोट झाल्यानंतर दुसर्‍याच महिन्यात सचिन आपल्या पूर्वीच्या मैत्रिणीशी विवाहबद्ध झाला. एका अपत्यासह तो अमेरिकेत सुखानं नांदतो आहे.

अमेरिकन स्थळाला हुरळलेले सुनेत्राचे आईवडील, लग्नानंतर स्वत:च्या बदलणार्‍या आयुष्याचा थोडासुद्धा विचार न केलेली सुनेत्रा, जातीतल्या मुलीसाठी अडून बसलेले सचिनचे आईवडील आणि स्वत:च्या विचारांशी ठाम नसलेला अन् म्हणूनच लग्नाला पोरखेळ समजणारा सचिन हे सर्व जण या घटनेमध्ये बरोबरीने भागीदार असले तरीही जबरदस्त किंमत मोजली ती मात्र फक्त सुनेत्रानंच. मानसिक, भावनिक, लैंगिक आणि कौटुंबिक अत्याचाराची सुनेत्रा बळी ठरली.
घटस्फोट घेण्याआधी एका भयानक मानसिक टप्प्यावर असताना सुनेत्रा मला भेटली. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सुनेत्राला समुपदेशनाची खूप मदत झाली. अनेक चर्चांमधून लग्न, लग्नित नातेसंबंध, त्यातल्या त्रुटी, त्याची उपयोगिता, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या प्रतिष्ठेच्या किंवा पाप-पुण्याच्या कल्पना अशा अनेक गोष्टींवर आम्ही बोलत गेलो. लग्न ठरवताना नक्की कोणते निकष तपासले जायला हवे होते याबद्दल सुनेत्राचे विचार स्पष्ट होत गेले. विलक्षण मृदू, गोड आणि लाघवी अशी सुनेत्रा आज एका चांगल्या आयटी कंपनीमध्ये उत्तम पगारावर नोकरी करते आहे. स्वत:चं घर घेऊन आत्मविश्‍वासानं एकटीच राहते आहे. सुयोग्य जोडीदार मिळेपर्यंत वाट पाहण्याची तिची तयारी आहे. पण तिच्या आयुष्यात झालेल्या या अपघाताचे व्रण तिच्या मनावर कायमचे कोरले गेले आहेत. केलेल्या चुका सुधारू शकतात; पण झालेल्या परिणामांची तीव्रता तशीच राहते.

- लीना कुलकर्णी

sandykul07

Posts : 4
Join date : 14/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही