नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

बहिणाईची गाणी - बहिणाबाई चौधरी

Go down

बहिणाईची गाणी - बहिणाबाई चौधरी Empty बहिणाईची गाणी - बहिणाबाई चौधरी

लिखाण  aplemarathijagat on Sat May 19, 2012 9:27 pm

बहिणाईची गाणी - बहिणाबाई चौधरी 8979_MahaS

विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा मराठी वाङ्मयाचा सुवर्णकाळ समजला जातो. केशवसुत, विनायक, भा. रा. तांबे अशा प्रतिभावान कवींनी त्या काळात आपल्या प्रतिभेने सार्‍यांना मोहित केले होते, तर त्याच काळात ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकर या दोन प्रतिभाशाली कादंबरीकारांनी आपल्या पूर्णपणे वेगवेगळ्या विचारपद्धतीच्या जोरावर मराठी साहित्यात नवे युग निर्माण केले होते. त्याच काळात शिवराम महादेव परांजपे, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, श्री. म. माटे असे काही लेखक काही वेगळा विचार मराठी साहित्यातून मांडू पाहत होते आणि हा सारा बहर येण्याआधीच्या काळात ह. ना. आपटे, ना. ह. आपटे आदींच्या कादंबर्‍यांची भुरळ मराठी वाचकांवर पडली होती. पण मराठी साहित्याचा हा सारा व्यवहार प्रामुख्याने मुंबई-पुणे फार तर नाशिक या पट्ट्यातच सुरू होता. नाशिकचे नाव घेण्याचे कारण असे त्याच परिसरातून अचानकपणे लक्ष्मीबाई टिळक यांच्यासारखं साहित्यरत्न अचानकपणे रसिकांच्या हाती लागलं होतं आणि त्यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मकहाणीनं लोक भारावून गेले होते. लेखनाची साधी धुळाक्षरेही नीटपणे गिरवलेली नसताना लक्ष्मीबाईंच्या हातून उतरलेल्या या अत्यंत निरलस आणि निर्व्याज तसंच अत्यंत परखड अशा आत्मकहाणीमुळे मराठी साहित्याच्या विश्वात एक नवेच दालन उघडले गेले होते. त्याच सुमारास मराठी साहित्यप्रेमींच्या हातात असाच एक साहित्याचा अदभूत ठेवा अचानकपणे आला आणि त्याचे सारे श्रेय हे आचार्य अत्रे यांच्याकडे जाते. खानदेशातील सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी हे अत्रे यांचे निकटचे स्नेही होते आणि बहिणाबाई या त्यांच्या मातोश्री. एके दिवशी अचानक सोपानदेव आचार्यांकडे आले आणि पुढे काय झाले ते खुद्द अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कविता पहिल्यांदाच म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षानी, १९५२ मध्ये प्रकाशित झालेल्या संग्रहाच्या प्रस्तावनेत लिहून ठेवलं आहे. तो अनुभव अत्रे यांच्याच शब्दांत घ्यायला हवा :

बहिणाबाई या सोपानदेवांच्या मातोश्री. गेल्याच वर्षी (१९५१) वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी वीस-बावीस वर्षांची मैत्री आहे. पण त्यांच्या माजघरात सोन्याची खाण दडलेली असेल, याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वतŠला याची जाणीव असेल पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वर्‍हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे ‘सुशिक्षित आणि सुसंस्कृत’ महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक! म्हणून ते इतकी वर्षे तोंडात मूग धरून बसले. मागल्या दिवाळीच्या आधी ते एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखविली :

येहरीत दोन मोटा
दोन्हीमधी पानी एक
मोट हाकलतो एक
जीव पोसतो कितीक?

त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि आणि आधाशासारख्या सार्‍या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, ‘अहो, हे बावनकशी सोने आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे.’ त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करावयाचे आम्ही ठरविले.

अत्रे यांनी त्यानंतर तातडीने प्ररचुरे प्रकाशन मंदिराचे ग. पां. परचुरे यांच्याशी संपर्क साधला आणि बहिणाबाईंच्या कविता त्यांच्या मृत्यूनंतर का होईना ‘छाप्यात’ आल्या. पुस्तकातून त्या घराघरांत गेल्या आणि अनेकांच्या ओठांवर जाऊन बसल्या. ग्रामीण भागातील अर्धशिक्षित अशा एका महिलेनं आपल्या स्वतŠच्या शब्दांतून व्यक्त केलेल्या भावना इतक्या प्रभावी होत्या की एकदा त्या ओळी कानांवर पडल्यावर त्या आठवणीत कायमच्या रुतून बसायच्या! साध्या-सोप्या शब्दांत त्यात व्यक्त झालेलं जीवनविषयक तत्त्वज्ञान तर या ओव्यांना थेट संतकवींच्या पातळीवरच घेऊन जाणारं होतं. आज पन्नास-पाऊणशे वर्षांनंतरही

बरा संसार संसार
जसा तवा चुह्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर

या आणि अशा अनेक काव्यपंक्ती मराठी माणसाच्या मनातून दूर होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळेच या अशा अजरामर ओळींची गाणी होणं जितकं स्वाभाविक होतं, तितकंच ती रेडिओवरनं पुढची पाच-सात दशकं वाजत राहणं, हेही अपेक्षितच होतं. बहिणाबाईंच्या प्रतिभेचे अनेक नमुने इथे सादर करता येतील. पण वानगीदाखल त्यातील एक सादर करण्याचा मोह आवरता येणं कठीण आहे. आपलं मन चंचल असतं, हे सर्वांनाच ठाऊक आहे. बहिणाबाई आपल्या साध्यासोप्या आणि खानदेशी बोलीत म्हणतात :

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभाळात!

बहिणाबाईंच्या कविता या खरं तर सर्वांनी मुळातूनच वाचायला हव्यात. त्याची गोडी ही अशा ‘सुशिक्षित आणि सुसंस्कृत’ शब्दांतून व्यक्त करता येणं कठीणच आहे.

प्रकाश अकोलकर

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही