नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


खंडेरायाच्या शोधात..

Go down

खंडेरायाच्या शोधात.. Empty खंडेरायाच्या शोधात..

लिखाण  Admin on Mon May 14, 2012 12:31 am

खंडेरायाच्या शोधात.. Sd
खंडेरायाच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष करून आपण शंकराचा अवतार मानून भक्तिभावाने त्याच्या पूजेत रंगून गेलो. खंडेरायाच्या चरित्राकडे ऐतिहासिक दृष्टीने बघणाऱ्या महात्मा फुल्यांनी मला चकित केले आणि मी खंडेरायाच्या अभ्यासाकडे वळलो. खंडेरायाच्या मूळ रूपाचा शोध घेताना ऐतिहासिक पुरावे हाती लागण्यापेक्षा अडथळेच खूप आहेत, याचा मला प्रत्यय येऊ लागला. कारण संस्कृती संक्रमणात खंडेरायाचा मूळ इतिहास काळ्याकुट्ट ढगांनी झाकोळून गेला आहे.
बळिराजाच्या हाताखाली क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी पार पाडणारे जे अधिकारी होते, त्यांपैकी खंडोबा हा क्षेत्रपती होता, असे प्रतिपादन महात्मा जोतिराव फुले यांनी त्यांच्या "गुलामगिरी' या इ.स. १८७३ मध्ये लिहिलेल्या ग्रंथात केले आहे. पुराणकथांमध्ये शंभर टक्के ऐतिहासिक सत्य नसते, ही गोष्ट खरी असली तरी खंडोबा ही इतिहासकाळातील पराक्रमी व्यक्ती होती, या ऐतिहासिक सत्याकडे महात्मा फुल्यांनी वाचकांचे लक्ष वेधले, ही फार महत्त्वाची बाब आहे. या ऐतिहासिक वीरपुरुषाला कालांतराने जनमानसाने कृतज्ञतेने देवतास्वरूप दिले. देवतास्वरूप प्राप्त झाल्यानंतर खंडोबा लोकदैवताच्या स्वरूपात सर्वत्र पुजला जाऊ लागला.

आंध्र-तेलंगणापासून कर्नाटक-महाराष्ट्राच्या विशाल भूप्रदेशावर अधिराज्य गाजविणाऱ्या खंडेरायाच्या ऐतिहासिक चरित्रावर काळाच्या प्रवाहात कल्पनेची अनेक पुटे चढत राहिली आणि खंडेरायाचा मूळ इतिहास दृष्टीआड होत गेला.
उपरोक्त ग्रंथात म. फुल्यांनी मांडलेले मत "प्रचाराच्या अभिनिवेशातून उद्‌भवलेले आहे,' असे प्रतिपादन प्रख्यात संस्कृती-अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केले. पुढे अन्य अभ्यासकांनी म. फुल्यांच्या विचाराकडे दुर्लक्ष केले आणि ते डॉ. ढेरे यांच्या मार्गानेच गेले. घोड्यावर आरूढ झालेल्या, हाती मोठे खङ्‌ग धारण करणाऱ्या, स्वतःच्या पत्नीसह युद्धामध्ये दंग असणाऱ्या, सैनिकी आरभाटात मूर्तिरूपाने आपल्यासमोर साक्षात उभ्या असणाऱ्या खंडेरायाच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष करून आपणही शंकराचा अवतार मानून भक्तिभावाने त्याच्या पूजेत रंगून गेलो. खंडेरायाच्या चरित्राकडे ऐतिहासिक दृष्टीने बघणाऱ्या म. फुल्यांनी मला चकित केले आणि मी खंडेरायाच्या अभ्यासाकडे वळलो. गेली काही वर्षे मी खंडेरायाच्या मूळ रूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. हा शोध घेताना ऐतिहासिक पुरावे हाती लागण्यापेक्षा अडथळेच खूप आहेत, याचा मला प्रत्यय येऊ लागला. कारण संस्कृती संक्रमणात खंडेरायाचा मूळ इतिहास काळ्याकुट्ट ढगांनी झाकोळून गेला आहे.

ऐतिहासिक वीरपुरुष म्हणून आणि लोकदैवत म्हणून खंडेरायाची प्रतिमा दूषित करण्याचे पहिले काम इसवी सन १२६० ते १५४० या दरम्यान लिहिल्या गेलेल्या "मल्हारिमाहात्म्य' या संस्कृत ग्रंथाने केले. हा संस्कृत ग्रंथ इ. स. १५८५ मध्ये सिद्धपाल केसरी नामक कवीने मराठी भाषेत आणला. संस्कृत "मल्हारिमाहात्म्य' या ग्रंथाने आंध्र-तेलंगण-कर्नाटकासह महाराष्ट्रात खंडेरायाला अवताररूप बहाल केले आणि सिद्धपाल केसरीच्या मराठी ग्रंथाने तर खंडेरायाच्या शंकर अवतारावर शिक्कामोर्तबच केले. या दोन्ही ग्रंथांचा इतका प्रभाव पडला, की पुढे लोकपरंपरा-लोकसंस्कृती-वाघ्यामुरळीची गाणी, संतवाङ्‌मय इत्यादी सर्व लिखित सामग्री त्या ग्रंथाची "री' ओढू लागले. ही सर्व सामग्री खंडेरायाच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा शोध घेताना अभ्यासकाला बुचकळ्यातच टाकू लागली.
लोकदैवताचे लौकिक रूप

""खंडोबा हा महाराष्ट्राचा कुलदेव आणि विठोबा हा इष्टदेव. अनेक कुलदेवतांना इष्टदेवतेची प्रतिष्ठा लाभते; ती प्रतिष्ठा खंडोबाला लाभली नाही,'' अशी खंत अभ्यासक व्यक्त करू लागले. ""संतांनी खंडोबाच्या उपासनेतील अनिष्टाचे निराकरण करण्यासाठी खंडोबावर आध्यात्मिक रूपके रचली. संतांचा हा प्रयत्न लोकमानसात रुजला असता- दृढावला असता, तर खंडोबा लोकधर्माच्या क्षेत्रातून अध्यात्माच्या क्षेत्रात प्रविष्ट झाला असता आणि विठोबाच्या भक्तांप्रमाणे खंडोबाच्या भक्तांची वाणी आदरणीय बनली असती,'' अशी खंत डॉ. रा. चिं. ढेरे यांसारखे अभ्यासक व्यक्त करताना दिसतात. वस्तुतः संस्कृती संक्रमणाच्या प्रचंड रेट्यापुढे मान न तुकविता खंडेरायाने स्वतःचे मूळ लोकदैवताचे लौकिक रूप अबाधित ठेवले. आपले ब्राह्मणीकरण होऊ न देता खंडेरायाने आपला लढाऊ बाणा कायम ठेवला. साऱ्या विधिविधानांमध्ये अवशेषरूपाने का असेना, थोडा फार मूळ ऐतिहासिक वारसा सांभाळून आजही खंडोबाचे अस्तित्व टिकून आहे. हा अवशेषरूपाने शिल्लक राहिलेला वारसा खंडोबाच्या चरित्राचा शोध घेताना अभ्यासकांना उपयोगी होऊ शकतो. त्यामुळे या टिकून राहिलेल्या सामग्रीबद्दल संशोधकांनी आनंद व्यक्त न करता त्याविषयी हळहळ व्यक्त करणारी ही अभ्यासकांची दृष्टी ऐतिहासिक वीरपुरुष म्हणून शोध घेताना साह्यकारी न होता, त्याच्या अवतारी रूपालाच अधिक प्राधान्य देणारी ठरते.

कन्नड भाषेतील अभ्यासक डॉ. चिदानंदमूर्ती, डॉ. श्रीनिवास रिती, डॉ. कलबुर्गी, डॉ. एम. बी. नेगिनहाळ आणि मराठीतील ल. रा. पांगारकर, त्र्यं. गं. धनेश्‍वर, डॉ. माणिकराव धनपलवार, श्री. पांडुरंग देसाई यांचा अपवाद वगळता अन्य अभ्यासकांनी खंडेरायाला दैवतरूप प्राप्त झाल्यानंतर जे घडले त्याचाच शोध घेण्यावर अधिक भर दिला. खंडेरायाच्या अवतार कल्पनेवर लिहिण्यात त्यांनी आनंद मानला. त्यामुळे ऐतिहासिक वीरपुरुष म्हणून खंडेरायाच्या चरित्रावर फारसा प्रकाश पडू शकला नाही.

महाराष्ट्रात खंडेरायाला खंडोबा, मल्हारी, म्हाळसाकांत, मार्तंड, मल्हारीमार्तंड अशी अनेक नावे आहेत. मल्लुखान, अजमतखान अशा नावांनी संबोधून मुस्लिम समाजातील लोकही खंडेरायाला भजतात. जेजुरी हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध खंडोबा क्षेत्र असले तरी पाली, नळदुर्ग, नेवासे, बीड, सातारे (औरंगाबाद), माळेगाव, निमगाव, बाळे (सोलापूर) या प्रसिद्ध ठाण्यांबरोबरच सुमारे २५० हून अधिक खंडोबाची ठाणी महाराष्ट्रात आहेत. एकट्या फलटणमध्ये खंडेरायाची वेगवेगळ्या काळातील पाच मंदिरे आहेत. ब्राह्मणांपासून सर्व पूर्वास्पृश्‍य जाती, आदिवासी जमातींमधील लोक खंडोबाचे भक्त आहेत.
खऱ्या अर्थाने खंडेराया बहुजनसमाजाचा लोकदेव आहे. म्हाळसा आणि बानू या खंडेरायाच्या दोन बायका. म्हाळसा वाण्याची, तर बानू धनगराची. याशिवाय फुलाई माळीण, रंभाई शिंपीण, चंदाई बागवानीण अशा एकूण पाच बायका खंडोबास होत्या, असा निर्देश वाघ्यामुरळीच्या गाण्यांमध्ये येतो.
खंडोबा मूळचा आंध्र प्रदेशातला. आंध्र तेलंगणात तो मल्लणा-मल्लिकार्जुन नावाने ओळखला जातो. आंध्रात केतम्मा आणि मेडलम्मा अशा दोन बायका त्याला असून, त्या दोघीही गोपालक- शिकारी जमातीच्या आहेत. कोमरवेल्ली धट्ट मल्लणा, आयरगल्ली येथील धट्ट मल्लणा, वरंगळ येथील कट्ट मल्लणा पेदिपाड (नल्लूर), पेनुगोंडे (अनंतपूर), मल्लालपत्रन ही आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरे आहेत. हैदराबाद येथे मुळात मुस्लिम समाजाचा असलेला मल्लणा, नंतर वरंगळ येथे निघून गेल्याचे सांगितले जाते. याशिवाय ओदिल्ला-गणेशपुरी अशा सतरा-अठरा ठिकाणी खंडोबाची भव्य मंदिरे आहेत.

ऐतिहासिक लढवय्या
महाराष्ट्र-आंध्र तेलंगणाप्रमाणेच खंडेरायाची अनेक मंदिरे कर्नाटकात आहेत. कर्नाटकात मैलार, मल्लया, मैलारलिंगेश्‍वर, राऊतराय, मैलारखंडोबा अशा नावांनी खंडोबा ओळखला जातो. हिरे मैलार, देवरगुड्ड, यातगिरी, देवरहिप्परगी, मंगसुळी, प्रेमपूर, देवी होसूर शिग्गेहळी, देवरपट्टणम्‌, धारवाड या ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून, कर्नाटकात खंडेरायाचे लाखो भक्त आहेत. गंगीमाळव्वा आणि कुरबत्यव्वा अशा दोन बायकांसह मल्लया कर्नाटकात नांदतो आहे. गंगीमाळव्वा उच्च जातीमधली असून, कुरबत्यव्वा कुरबा जातीची आहे. कुरबत्यव्वास, तुप्पदमाळव्वा आणि तुरगबाली अशीही नावे असलेली दिसतात. हिरे मैलार येथे तर सुमारे सहा फूट उंचीची बैठी मल्लयाची मातीची मूर्ती आहे. "मण्णू मैलार' असे त्यास संबोधले जाते. गोव्यातील म्हार्दोळ येथेही खंडोबाचे मंदिर आहे.
दक्षिण भारताच्या या तीन-चार राज्यांमध्ये मैलार मल्लणा- खंडेरायाची मोठमोठी मंदिरे असून, लाखो भक्तांच्या उपस्थितीत खंडेरायाचा यात्रा-उत्सव साजरा केला जातो. चैत्र, कार्तिक, माघ, मार्गशीर्ष या महिन्यांत यात्रा भरविल्या जातात. दसरा-दिवाळी, सोमवती अमावस्या हे यात्रेचे महत्त्वाचे दिवस आहेत. यात्रेतील अनेक विधिविधानांपैकी खंडेराया आपल्या सर्व साथीदारांसह जंगलात शिकारीला जातो. आपल्या लवाजम्यासह युद्धावर जातो. शिकारा खेळणे, युद्धाचा नकली खेळ खेळणे आणि विवाह सोहळा पार पाडणे, या गोष्टींना यात्रेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते. या वेळी खंडेराया घोड्यावर आरूढ असतो. तलवारी, भाला, धनुष्यबाण, मुसळ आ शस्त्रांचा वापर या वेळी केला जातो. सोबत घोडे, कुत्रे, मेंढरे यांसह शस्त्रधारी सैनिक असतात. अंगावर शस्त्रप्रहार करून रक्त काढणे, जखमांवर भंडारा टाकून जखमा बांधणे अशा क्रिया केल्या जातात. या सर्व गोष्टी खंडेरायाच्या लढाऊ व्यक्तिमत्त्वाकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या आहेत. खंडेराया मुळात एक ऐतिहासिक लढवय्या शूर वीर असल्याचे ते निदर्शक आहे. कर्नाटकात खंडोबाच्या सैन्याला "कंचवीर' अशी संज्ञा वापरली जाते. डॉ. गुंथर सोन्थायमरच्या ग्रंथाचे नावच मुळी "किंग ऑप हंटर्स, वॉरिअर्स अँड शेफर्ड' असे आहे. हे ग्रंथनाम खंडेरायाच्या ऐतिहासिक लढवय्या वीर असलेल्या बाबीवर शिक्कामोर्तब करणारे आहे. मुळात लढवय्या वीर असणाऱ्या व्यक्तीला आदरापोटी लोकांनी देव मानले आणि कालांतराने शंकराच्या तारकथा खंडेरायाशी जोडल्या गेल्या. या अवतारात इतक्‍या प्रभावी ठरल्या, की लोकांना मैलार- मल्लाणा खंडेरायाच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण झाले.

पंथपरंपरा
पूर्वजपूजेची प्रथा सर्व भारतभर प्राचीन काळापासून रूढ आहे. पूर्वजाच्या मृत्यूनंतर त्याला देव्हाऱ्यावर पुजले जाते. कोणी ही पूजा मुखवट्याच्या स्वरूपात करतात, तर कोणी सोन्याचांदीचे "टाक' तयार करून पूजा करतात आणि आपल्या पूर्वजांची स्मृती जपतात. तसेच पूर्वजांच्या मृत्यूनंतर थडगे बांधतात, त्यावर पादचिन्ह अगर लिंगप्रतिमा कोरतात. काही ठिकाणी वीरगळीच्या स्वरूपात पूजा केली जाते. आज जरी खंडोबाच्या मंदिरात वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्ती आढळत असल्या, तरी प्रत्येक मंदिरात लिंगप्रतिमा आहेत. कर्नाटकातील देवराहिप्परगी, कारमनी या ठिकाणी खंडोबाचे पितळी "टाक' आहेत. जेजुरीलाही "टाक' आहेत. या संदर्भात डॉ. रा. चिं. ढेरे लिहितात, ""वीरपुरुषाचे दैवतीकरण होणे शक्‍य आहे. भारतीय देवता-संभारात अशा अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध देवता आहेत, की ज्या मूलतः मनुष्यरूपाने इतिहासावर ठसा उमटवून गाजल्या आहेत. प्रत्यक्ष कर्नाटकातच "वीरगळ' नामक अनेक स्मृती-शिला स्थानिक वीरांच्या स्मरणार्थ पूजिल्या जातात. देवता-विज्ञानातील या विवक्षित प्रक्रियेप्रमाणे खंडोबाची निर्मिती झाली असणे शक्‍य नाही.''

याच संदर्भात एक तरुण संशोधक डॉ. नीरज साळुंखे आपल्या "दैत्यबळी व कुंतलदेश महाराष्ट्र' या ग्रंथात लिहितात, ""राष्ट्रकुटांच्या दख्खनवर सत्ता प्रस्थापित झाल्यावर कर्नाटकमध्ये योद्‌ध्यांच्या स्मरणार्थ वीरगळ उभारण्याच्या प्रथेस महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते. गदग-बेटगेरी, रोन, अन्निगेरी, बेन्टूर, सिरूरजा, यल्लीसिरूर इत्यादी उत्तर कर्नाटकातील स्थलांतर राष्ट्रकुटांचे वैविध्यपूर्ण वीरगळ मिळालेले आहेत. यातील गदग-बेटगिरी या धारवाड जिल्ह्यातील स्थळी सोळा वीरगळ सापडले आहेत. ज्या स्थळी हे वीरगळ सापडलेले आहेत, त्यास "मल्लरायण कट्टे' असे म्हटले जाते. ही बाब ध्यानात घेता खंडोबा मुळात शूर वीर होता, त्याच्या मृत्यूनंतर त्याला देवत्व देऊन लिंग, टाक, वीरगळ स्वरूपात त्याची पूजा सुरू झाली.

माणिक धनपालवार लिहितात, ""श्रेष्ठ नायकाच्या मृत्यूस्थळी समाधी बांधून लिंगस्थापना करतात किंवा वीरगळ उभारतात. मैलार हा देव मूलतः लिंगरूपात होता. एकदा लिंगस्थापना झाली, की भक्त पूजाअर्चा करतात. माहात्म्यपर स्तोत्रे, पदे रचली जातात, प्रतिवर्षी जत्रा भरते, त्या दैवतांची प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत जाते आणि हळूहळू एक पंथपरंपरा मूळ धरू लागते.''

मूळ आंध्र तेलंगणातील मल्लणा गोल्ला गवळी लोकांचा शूर वीर-नायक-पराक्रमी वीर होता. आंध्रातून प्रथम बिदरजवळील प्रेमपूर येथे आला आणि तिथे स्थिरावला. जेजुरी ही खंडेरायाची राजधानी आहे असे महाराष्ट्रातील भक्त मानत असले, तरी प्रेमपूर हेच त्याचे मूलस्थान आहे अशी भक्तांची दृढ धारणा आहे. बिदरजवळच्या प्रेमपुरात गेल्यावर तेथील मंदिराच्या विशाल परिसरात विखुरलेले उद्‌ध्वस्त अवशेष पाहिले असता, या मंदिराच्या गतवैभवाच्या अनेक खाणाखुणा दिसू लागतात. आंध्रातील अयरअल्ली मंदिरातील चौसष्ट खांबांचा भव्य दगडी नृत्यमंडप पाहून एके काळी तेथे चालणाऱ्या (वाघ्यामुरळी) ओग्गया मुरुळीच्या नृत्यसाधनेची प्रचिती येते.

अवतारकल्पनेवर कठोर प्रहार करणारे महात्मा फुले खंडेरायाकडे शंकराचा अवतार म्हणून बघणे शक्‍यच नव्हते. खंडेराया इतिहासकाळातील पराक्रमी व्यक्तिमत्त्व होते ते सांगताना म. फुले यांच्या सत्यशोधक, संशोधक दृष्टीचा प्रत्यय येतो. भोळेभाबडे श्रद्धाशील भक्त खंडेरायाकडे कोणत्याही दृष्टीने पाहोत; पण संशोधक अभ्यासकांनी खंडोबाकडे कसे बघावे, हे सांगणारे फुले अभिनिवेशी निश्‍चितच नव्हते, याचा अनुभव खंडेरायाचा अभ्यास करताना येतो.

प्रा. विश्‍वनाथ शिंदे
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही